Home >> About us >> Chronological Biodata>>Sanchar 23 Jan 1997
Sanchar 23 Jan 1997
वास्तुशास्त्र नव्हे ज्योतिषशास्त्र
सोलापूर दि. २२ ‘वास्तुशास्त्राच्या नावाखाली वास्तुशास्त्रज्ञांनी बनवाबनवी सुरू केली असून वास्तुशास्त्र हे वास्तुशास्त्र नसून ज्योतिषशास्त्र आहे. असे प्रतिपादन प्रा. शिरीष देशपांडे यांनी केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् सोलापूर शाखेच्यावतीने ‘विज्ञानयुगात वास्तुशास्त्राचे प्रयोजन’ या विषयावर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. वास्तुशास्त्राचा उगम कसा झाला हा वादाचा मुद्दा असमन उच्चवर्णियांनी स्वत:च्या स्वार्थासाठी घर कसे असावे, मंदिर कसे असावे आणि राजवाडे कसे असावेत या विषयी लिहून ठेवले आहे. त्याला प्रमाण मानून वास्तुशास्त्राची निर्मिती झाली असे म्हणता येत नाही. असे सांगून प्रा. देशपांडे पुढे म्हणाले की, ज्यावेळी वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिण्यात आले त्यावेळी तत्कालीन ऋषीमुनी समाजात वावरत नसत ते पर्वतावर किंवा घनदाट जंगलात जाऊन आपले आयुष्य कंठत असत. जे घरात राहिले नाहीत त्यांना आदर्श घरांची कल्पना काय येणार? असेही ते म्हणाले. एखादी वास्तु बांधण्यापासून तयार होइपर्यंत धार्मिक विधी करावे लागतात. याचा उल्लेख वास्तुशास्त्रात आहे. प्रस्थापितांनी आपले वर्चस्व लोकांवर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वातावरण तयार केले की प्रत्येकाने धार्मिक विधी केलेच पाहिजे. त्यामुळे गरीबांवर अन्याय होत राहिला. कोणतीही इमारत बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घेतला पाहिजे. असे वास्तुशास्त्राचे समर्थन करून ऍड. अरविंद वझे म्हणाले की ‘पुराणकाळात थोर ऋषीमुनींनी वास्तुशास्त्राचा अभ्यास करूनची मोठे-मोठे ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथात ‘आदर्श घर कसे असावी.’ आणि घरातील मांडणी कशी असावी याची उत्कृष्ठ माहिती आहे. ठराविक दिशेला दार बांधल्यास घराण्याची भरभराट होते त्यामुळे कोणतीही इमारत बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घेतलाच पाहिजे, असेही ते म्हणाले. सुंदर घराची मांडणी कशी असावी यावर बोलताना ऍड. वझे म्हणाले की, घरात पुरेशी हवा यावी, घराजवळ मोठी झाडे नसावीत आणि घरात मृत व्यक्तींची छायाचित्रे लावू नयेत. या छायाचित्रामुळे लहान बालकांवर विपरित परिणाम होतो, असेही ते म्हणाले.
वास्तुशास्त्र नव्हे थोतांड
डॉ. प्रदीप पाटील यांनी वास्तुशास्त्रांची खिल्ली उडविताना सांगितले की, हे वास्तुशास्त्र नसून थोतांड आहे. प्रस्थापितांनी आपल्या सोयीसाठी अशा ग्रंथाची निर्मिती केली आहे. घरे बांधताना ब्राह्मणांनी माडी बांधावी शूद्रांनी बांधू नये असे संकेत आहेत. तसेच इमारतीसाठी पांढरे दगड आणि पांढर्या वस्तू ब्राह्मणांनी वापराव्यात आणि शूद्रांनी काळ्या वस्तू वापराव्यात असा वास्तुशास्त्रात उल्लेख आहे. तसेच ठराविक दिशेला तोंड करून झोपल्यास रोग पळून जातो, अशा थोतांडाचा उल्लेख या वास्तुशास्त्रात आहे.
सध्या वास्तुशास्त्राच्या नावावर वास्तुशास्त्रांज्ञानी बनवाबनवी सुरू केली असल्यास आरोप करून डॉ. पाटील म्हणाले की, कोणतेही शास्त्र विज्ञानांनी सिद्ध केल्याशिवाय अधिकृत शास्त्र ठरत नाही. वास्तुशास्त्रावर चातुर्वर्णाचा पगडा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील त्यांच्या काळात वास्तुशास्त्रावर कडाडून हल्ला केला आहे.
संजय महाशब्दे यांनीही या परिसंवादात आपला सहभाग नोंदविला. ते म्हणाले कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करीत असताना त्याच्या इतिहासाचा अभ्यास झाला पाहिजे, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनाच ठराविक विषयावर बोलण्याचा वा टीका करण्याचा अधिकार आहे. विज्ञानात प्रत्येक शास्त्राची व्याख्या केली जाते. त्यामुळे वास्तुशास्त्र थोतांड आहे असे म्हणता येणार नाही.
सुरूवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. इंडियन इंन्स्टिट्यूटस ऑफ आर्किटेक्स सोलापूर केंद्राचे अध्यक्ष अशोक पवार यांचे हस्ते यावेळी पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीष कुमठेकर यांनी केले.