विदर्भातील वाशिम येथील वास्तूशिल्पाचा उच्चांक बालाजीचे मंदिर सतत सहा महिने गाभार्यातील मूर्तीवर सूर्यकिरण
विदर्भातील एक संशोधक सं.भा. महाशब्दे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करून त्यावर नवा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न ते करीत असतात. अकोला येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी (आर्किटेक्चर) डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून ते काम करीत आहेत. भारतीय ऐतिहासिक वास्तुशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. स्वराज्यात गेल्या एप्रिलमध्ये शिवजयंतीनिमित्त त्यांनी रायगड किल्ल्याचे वास्तुशास्त्रदृष्ट्या महत्व सांगणारा लेख लिहिला होता. तो अनेकांना आवडला होता या लेखातून त्यांनी वाशिम शहरातील बालाजी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली आहे.
विदर्भातील आजचेवाशिम (पूर्वीचे वत्सगुल्म) हे शहर एकेकाळी राजाधानीचा दर्जा व वैभव भोगलेले पुराणप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याकाळी ज्योतिषज्ञांनी कल्पिलेली पृथ्वीची मध्यरेषा लंकेपासून निघून याच वाशिम शहरावरून पुढे मेरूपर्यंत जात असे असा स्पष्ट उल्लेख भास्कराचार्यांच्यासिद्धांत शिरोमणी नामक ग्रंथातील पुढील श्लोकात आला आहे-
"पुरी रक्षसां देवकर्यायं कांची
सित: पर्वत: पर्यली वत्सगुल्मम.
पुरी चोज्जयित्याह्या गर्गराट.
कुरूक्षेत्र मेषा भुवो मध्यरेषा"
या मध्यरेषेची खूण म्हणून स्थापन केलेल्या शिवलिंगाचेमध्यमेश्वर हे नावही सार्थच होते. आज मध्यमेश्वराचे लिंग अस्तित्वात नाही, त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. याच वत्सगुल्म शहरात अनेक देवस्थाने आहेत. पैकीश्रीमंत बालाजी मंदिराविषयी नवीन दृष्टिकोनातून केलेला अभ्यास जाणकारांसमोर मांडण्यासाठी हा लेखन प्रपंच.
मूर्तीवर थेट सूर्यकिरणे
अतिशय सुबक, साधी परंतु रेखीव आणि भव्य अशी या देवालयाची बांधणी आहे. सुमारे २१० वर्षापूर्वी उभारलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य असे की वर्षभरातील सूर्य उत्तरायणात असतो त्या सहा महिन्याच्या काळात दररोज सकाळी ८/९ वाजेच्या दरम्यान, जवळपास एक तासपर्यंत गर्भगृहातील श्रीमंत बालाजीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे येतात.
भारतातील प्राचीन वास्तुंमध्ये विशेषत: मंदिरांमध्ये हा प्रकार नवीन नाही. कोणार्कचे सूर्यमंदिर, कोल्हापूर निवासीनी महालक्ष्मीचे मंदिर तसेच, विदर्भातील माहूर येथील रेणुका देवीचे मंदिर यासाठी प्रसिद्ध आहेत.
अशा ऐतिहासिक वास्तूंमध्ये अस्तित्वात असलेला हा प्रकार म्हणजे प्राचीन भारतातील वास्तुशास्त्रीय प्रगतीचा प्रत्यक्ष पुरावा होय. खगोलशास्त्र व वास्तुशास्त्राच्या मिलापातून तत्कालीन सामाजिक गरजेनुसार धार्मिक भावना जोपासण्यासाठी घडविलेला हा चमत्कार अभिमानास्पद असाच आहे.
मंदिरातील गर्भगृहात मूर्तीच्या समोरील भिंतीत प्रवेशद्वाराचे अगदी वरच्या बाजूस एक कोनाडा, झरोका वजा खिडकी असून येथूनच अंधार्या गर्भगृहातील बालाजीचे दर्शन घेणे सूर्यनारायणास शक्य होते. मंदिर हे हिंदु परंपरेनुसार पूर्वाभिमुख असले तरीहि पश्चिम-पूर्व रेषेशी उत्तरेच्या दिशेने ११.१/२ च्या कोनांत मंदिराची मध्यरेषा ठेवून बांधणी केलेली आहे. केवळ यामुळेच सूर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून म्हणजे २१ डिसेंबरपासून ते थेट २२ जून म्हणजे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होईपर्यंतच, सूर्यकिरण मूर्तीवर येतात.
ऐतिहासिक रहस्याची उकल
खगोल वास्तुविज्ञानाचा अभ्यासक या नात्याने या वैशिष्ट्यपूर्ण रचनेची वास्तुशास्त्रीय उकल करणे, मला अवघड वाटत नाही. किंबहुना तत्संबंधीची चर्चा विज्ञाननिष्ठांशी स्वतंत्रपणेहि करता येईल. परंतु या लेखनाचा हेतु असा की, ज्या दिवशी मूर्तीवर सूर्यकिरणे येण्यास सुरूवात होते, त्या २१ डिसेंबर अथवा समाप्ती होते त्या २२ जून रोजी कुठल्याही प्रकारचा उत्सव वा महापूजा बालाजी मंदिरात होत नाही. वर्षभरातील बालाजीचे सगळे उत्सव दक्षिणायनाच्या काळात होत असताना उत्तरायणाच्या काळातच मूर्तीवर सूर्यकिरणं का येतात? कारण काय?
ज्या काळू घराण्यातील मंडळीकडे गेल्या पाच पिढ्यांपासून मंदिराच्या व्यवस्थापनेची जबाबदारी आहे, त्यांच्याकडेही या प्रश्नास उत्तर नाही. हे समजल्यानंतर या रहस्याची उकल व्हावी असं वाटू लागले.
साक्षात्कार व संकल्प
श्रीमंत बालाजी मंदिराचे असे कुठले रहस्य उत्तरायणकाळात दडलेले आहे, ते शोधून काढण्यासाठी इतिहासाच्या अंधार्या गर्भगृहात डोकावलो आणि अचानक सूर्यनारायणाच्या प्रखर प्रकाशाचा दैदीप्यमान स्रोत ते ऐतिहासिक रहस्य उघड करून गेला.
इतिहासप्रेमींना ही माहिती निश्चितच उद्बोधक वाटावी. नागपूरचे पहिले रघुजी राजे भोसले यांच्या काळात, भवानी काळे हा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, वर्हाडातील मंगरूळ तालुक्यातील खडीधमणी वगैरे गावाचा वतनदार पटवारी होता. त्याचा भाचा राजाराम वाळके हा प्रथम जानोजीचा भाऊ बाळाजी याकडेच नोकर राहिला. साबाजीचे पदरी राजाराम वाढत जाऊन दिवाण झाला, त्यामुळे इकडे भवानी काळे वर्हाडात मामलेदार लागले. राजारामपंतामुळेच भवानीपंतांची व साबाजी बाबाशी ओळख होऊन ते साबाजीचे दिवाण झाले.ह स्वकर्तुत्वावर जानोजीचाही विश्वास संपादन करून भवानीपंत काळे हळूहळू पुढे येऊन भोसल्यांचे फौजेचा मुख्य सेनापती झाला. यानेच वाशिम येथील प्रसिद्ध बालाजी मूर्तीची स्थापना केली व देवालय बांधले. हाच भवानीपंत पुढे कटक प्रांताचाही सुभेदार होता.
राजे रघुजीस २८.२.१७२३ साली मिळालेल्या सनदीनुसार बंगाल, मुकसुदाबाद प्रांत, पटणे इ. प्रांत भोसल्यांच्या अधिपत्त्यांखाली होता. परंतु वर्हाड व महाराष्ट्राच्या राज्य कारभारातील समस्यांमुळे बंगालच्या प्रांताकडे फारसे लक्ष देणे भोसल्यांना शक्य झाले नसावे. बराच मोठा प्रांत असूनहि कुठल्याच प्रकारची देणगी खंडणी अथवा मिळकत बंगालातून होत नसल्याने, भोसल्यांनी पहिल्या रघुजीराजांच्या कारकीर्दीत बंगाल, कटक प्रांतावर अनेक स्वार्या केल्या. परंतु विशेष यश प्राप्त झाले नाही.
पुढे १७७९ साली रघुजीराजांचे चिरंजीव चिमणाबापूराजे भोसले यांनी सरदार भवानीपंत काळे यांच्यावर बंगालच्या स्वारीची जबाबदारी सोपविली. स्वत: राजेश्रींना समेवत घेऊन भवानी काळे यांनी शुभ मुहूर्ती नागपुराहून प्रयाण केले.
तत्पूर्वी वाशिम येथे एक रजपूत स्त्री मरण पावली. (संस्थान वाशी, जिल्हे मेहफक, सन ११८७ फस्लीत वाशीम कबज्यातील - एक रजपूत स्त्रीची मौतमाती करण्यासाठी कैफीयत बालाजी मंदिर संस्था) तिची मौत माती करण्यसाठी चंद्रतिर्थाचे पश्चिमेस, हल्ली जेथे कुंपण घालून जागा राखून ठेवली आहे. त्या ठिकाणी रजपूत मंडळीनी खड्डा खोदला. तो खणीत असता, आतून प्रथम महादेवीची पिंड व काही मूर्ती निघाल्या. ही बातमी गावात पसरली. नंतर तेथेच आणखी खड्डा खणला असता बालाजीची मूर्ती सापडली. मूर्तीसाठी मंदिर बांधण्याच्या अधिकारावरून गावात चर्चा व वाद सुरू झाला. (सन ११८७ फसली म्हणजे इ.स.१७७९)
त्याच काळात नागपूरहून बंगालच्या स्वारीवर जाण्यास निघालेले मिनणाबापूराजे भोसले व सरदार काळे वाशिम मुक्कामी पोहचले. त्यांनी ही हकिकत ऐकली व मूर्तीच्या दर्शनास गेले. सश्रद्ध अंतकरणाने बालाजी मूर्तीस साष्टांग दंडवत घालून, भवानीपंतांनी मनोमन संकल्प सोडला.
बंगाल प्रांताची मोहीम हे बिकट जोखमीचे कार्य, राजियांनी विश्वासोन मजवरील सोडिले, अशात दर्शनाचा शुभशकुन जाहला, तव कुपे करोन कार्यसिद्धी जाहल्यास, वाशिम येथेच भव्य देवालय बांधवीन.
अशा प्रकारे बालाजीचे दर्शन घेऊन भोस्ल्यांच्या सेनासाहेबाने बंगाल प्रांताकडे घोडदौड सुरू केली व लवकरच कटक प्रांती पोहोचले. (पुण्याच्या नाना फडणीसांचा एक प्रतिनिधी कलकत्त्यास राहत असे. त्याने याच दरम्यान नानाना लिहिलेली कांही पत्रे उपलब्ध आहेत. पैकी त्यांच्या पहिल्या पत्राचा अनुवादराजेश्री चिमणाबापू भोसले अपने सरदारों और सेनासहित ज्येष्ठ मासमे ३० हजार सैनिकोकेसहित कटक पहुँच गये थे| मध्य प्रदेश का इतिहास व नागपूर के भोसले - प्रयागदत्त शुक्ल यांच्या पुस्तकामधुन
तिकडे कटक प्रांती मिरजाफर याला समजले की -
रघोजी भोसले यांचे चिरंजीव मिचणाबापूसोबत एक ब्राह्मण सरदार (भवानीपंत) जमीयतीनिशी भारी जमाव झाला आहे. ते एकूण मिरजाफर वरद्वानचे मार्गाने निघून गेला. भवानीपंतांनी ठाणी कायम करून मकसदाबाद प्रांती उपद्रव केला. लोक बेजार झाले म्हनून अल्लाबिदीखान याजकडे रयत लोकांची फिर्याद बहुत गेली. त्याने वकील पाठविला. बाबासाहेबास नागपुरास भेटून खंडणी देण्याचा विचार बोलण्यात आणला. तेव्हा सेनासाहेब सुभा भवानीपंत बोलले, जेव्हा करोडो रूपये खर्चास देऊन फौजा पाठविल्या तेव्हा तुम्ही खंडणी देणार, त्यातही दगाबाजी करणार तुमचा विश्वास काय? तेव्हा वकीलाने कटक प्रांत वोढसा देऊन तह ठरविला. शिवाय तीस लक्ष खंडणी व शिवाय दहा लक्ष दरसाल तीन लक्ष याप्रमाणे घेऊन, चिमणाबापू व सेना बाहादार यांनी इकडील शह सोडून द्यावा, असे ठरले (नागपूरकर भोसल्यांची खबर - काशीराम रोजश्वर गुप्ते)
भवानीपंतांची यशस्वी स्वारी
अशा प्रकारे अनेक स्वार्या करूनही जे यश मिळू शकले नव्हते. ते यश सरदार भवानीपंतांनी प्राप्त झाले. राजे प्रसन्न झाले व त्यांनी कटक प्रांताची सुभेदारी बहाल केली. भवानीपंतांचे संबंध आयुष्य उजळून निघाले.
बंगाल स्वारीवर निघण्यासाठी उतरायणाचा मुहूर्त जाणीवपूर्वक भवानीपंतांनी शोधला असावा असे म्हणावयास हरकत नाही. त्याकाळी राज्यकर्त्यांना ब्राह्मणांचे व ब्राह्मणांना शुभमुहूर्ताचे असलेले महत्व सर्वश्रुत आहे. तसेच युद्धासाठी स्वारीसाठी मुहूर्ताचा एक दिवस पुरेसा नसून संपूर्ण युद्धकाळी हा मुहूर्त बघून ठरविला जात असे. हिंदुधर्म- शास्त्राप्रमाणे उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा श्रेष्ठ समजला जातो. भवानीपंत काळू उत्तरायणाच्या सुरूवातीस नागपूरहून निघून ज्येष्ठ मासात म्हणजे उत्तरायणाच्या उत्तरार्धातच कटक प्रांती पोहचले आणि फारसे युद्ध न होता ताबडतोब म्हणजे दक्षिणायान सुरू होण्यापूर्वीच त्यांचा तह झाला व त्यांना अकल्पित यशोलाभ झाला.
सहा महिने मूर्तीवर सूर्यकिरणे
त्या स्वारीवरून परतल्यानंतर त्यांनी संकल्पपूर्तीसाठी श्री बालाजी मंदिर उभारले व तत्कालीन वास्तुशिल्पज्ञांकडून सूर्यकिरण मूर्तीवर येण्याची अद्भूत कल्पना साकार केली.
माहूर क्षेत्री रेणुकादेवीच्या मंदिरात वर्षभरातून फक्त संक्रांतीच्या दिवशीच देवीच्या मुखवट्यावर सूर्यकिरण येतात. तद्वतच कोणत्या तरी एका दिवशी बालाजी मूर्तीवर सूर्यकिरणे येतील अशी व्यवस्था करणे शक्य होते. परंतु तसे न करता ज्या उत्तरायण काळाने भवानीपंतांचे संबंध आयुष्य उजळून निघाले. तो काळ कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांनी सतत सहा महिने सूर्यकिरणं येतील अशी व्यवस्था करवली.
धन्य ते अप्रसिद्ध शिल्पकार, धन्य तो करविता.
दुर्मिळ कागदपत्रे अभ्यासली ठराविक वेळी मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीवरच सूर्यकिरणे येतील अशी अचूक वास्तुशास्त्रीय रचना करणार्या प्राचीन भारतातील अप्रसिद्ध वास्तुशिल्पाच्या कार्याची ही ओळख निश्चितच मार्गदर्शक ठरेल. वाशिम येथील बालाजी मंदिराचा हा अभ्यास करण्यासाठी मंदिराचे सध्याचे व्यवस्थापक श्री. काळू यांनी दुर्मिळ कागदपत्रे अभ्यासण्यासाठी दिली. सोबत त्यांच्या घराण्याची संपूर् माहिती सांगितली . त्यांच्या मदतीशिवाय हे कार्य होणे कठीण होते. त्याच्या सहकार्याने हा इतिहास आपणासमोर ठेवीत आहे.
मंदिर स्वयंपाकघरातील शेगड्या जाऊन स्टोव्ह आले, स्टोव्ह जाऊन गॅस आला, आता तर हॉटलाईन कुकिंग रेंजदेखील कालबाह्य ठरलाय सोलर कुकर म्हणजेच सौर चुलीच्या पदर्पणामुळे !
परंतु या सौर चुलीचा उपयोग स्वयंपाकघरातील कोपर्यातल्या ओट्यावर करता येत नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती प्रखर सूर्यप्रकाशाची प्रखर सूर्यकिरण स्वयंपाकघरात आणता येत नाहीत, म्हणून त्याच्या शोधार्थ सौर चुली घेऊन रणरणत्या उन्हात गृहिणींना वणवण भटकावे लागते.
एकविसाव्या शतकाकडे झेपवनाऱ्या प्रगत विज्ञान युगातील विद्वान वास्तुशिल्पकारांचे ही हार नव्हे का?